मुंबई : बऱ्याच वर्षापासून मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत जनतेची मागणी होती. साहित्यिक क्षेत्रामधून देखील याबाबतची मागणी होती. अखेर शासनाने आज निर्णय मंजूर करत मराठी भाषा विद्यापीठासाठी समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच या समितीची कार्यकक्षा देखील शासनाने ठरवून दिली आहे.
मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना: 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ अधिवेशनात घोषणा केली होती की, राज्यासाठी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना केली जाईल. ही स्थापना करण्याबाबत विचार होता परंतु प्रत्यक्ष पाऊल पडणे मात्र बाकी होते. शालेय शिक्षण विभागाने यासंबंधीचा निर्णय मंजूर करत ज्येष्ठ साहित्यिक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्यासह, एकूण सहा सदस्यांची ही समिती स्थापन केली आहे.
Sadanand More : मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी सदानंद मोरे यांची नियुक्ती
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तसेच मराठी महानुभाव साहित्य क्षेत्रातील आणि मराठी भाषिक जनतेकडून मराठी भाषा विद्यापीठाची मागणी होत होती. शासनाने आज मराठी भाषा विद्यापीठासाठी समिती गठीत केली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्यासह एकूण सहा सदस्यांची ही समिती निर्माण केली आहे.
समितीच्या कार्यकक्षा: मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता काय आहे. मराठी भाषा विद्यापीठाचे स्थान. तसेच त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत संरचना, अद्यावत इमारत, याच्यासह महत्त्वाचा प्रस्ताव तयार करणे. मराठी भाषा विद्यापीठासाठी प्रशासनिक कर्मचारी, त्यासाठी असणारा अर्थसंकल्पीय खर्चाबाबत शिफारसी करणे. मराठी भाषा विद्यापीठातून जर विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्यांना रोजगार कोणत्या क्षेत्रात कसा मिळेल, या संदर्भातल्या बाबी विचारात घेऊन, तसा अभ्यासक्रम तयार करण्यासाठीची पावले टाकणे. इतर पारंपरिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जात असताना, पुन्हा मराठी भाषा विद्यापीठात मराठीतून अध्ययन केल्यावर, त्याचा पारंपरिक विद्यापीठात संदर्भातील तुलनात्मक अभ्यास अध्ययन करणे. मराठी भाषेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बोलीभाषांचे संवर्धन त्याचा विकास या संदर्भातील महत्त्वाच्या शिफारसी करणे.
अभ्यासक्रम कालसुसंगतता : मराठी भाषा विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जाईल तो तयार करावा लागेल. त्यासाठीच्या महत्त्वाच्या शिफारशी या समितीने करणे अपेक्षित आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य विधिमंडळ भाषा समितीचे अध्यक्ष आहेत, ते देखील याचे सदस्य असतील. डॉ. विद्या रत्नाकर पाटील तसेच राजेश नाईकवाडे नागपूर हे देखील सदस्य आहेत. तर राज्याचे मराठी भाषा विभागाचे सहसचिव हे देखील सदस्य असतील. तर अमरावती विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण हे देखील या मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापने संदर्भातल्या समितीमध्ये सदस्य असतील, तर अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे असणार आहेत.