महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 15, 2019, 8:36 AM IST

ETV Bharat / state

दैनंदिन जीवनात विज्ञानाला सर्वाधिक महत्त्व द्या, डॉ. जयंत नारळीकर यांचे आवाहन

ब्राह्मण सेवा मंडळाकडून शनिवारी दादर येथे त्यांना 'ब्रह्मभूषण पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डॉ. नारळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकांनी अंधश्रद्धा घालवून विज्ञानाचा पुरस्कार करावा असे आवाहन केले.

mumbai
डॉ जयंत नारळीकर

मुंबई - कुठल्याही गोष्टीचा आपण अभ्यास करून त्यावर निर्णय घ्यायला पाहिजे, मात्र कोणीतरी सांगते म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाने विज्ञानाला सर्वाधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून पुढील काळात आपल्याकडे त्याचा दृष्टिकोन अधिक विकसित होईल, असे आवाहन ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व गणिती तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केले.

डॉ जयंत नारळीकर
ब्राह्मण सेवा मंडळकडून शनिवारी दादर येथे त्यांना 'ब्रह्मभूषण पुरस्कार' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. नारळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकांनी अंधश्रद्धा घालवून विज्ञानाचा पुरस्कार करावा असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी न्युक्लिअर बायोलोजिस्ट, डॉ. बाळ फोंडके, विशेष उपस्थितीत खगोल व्याख्याते मुकुंद मराठे, ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक लेले आणि नारळीकर यांच्या पत्नी व ज्येष्ठ गणित तज्ज्ञ मंगला नारळीकर आदी उपस्थित होते.

डॉ. नारळीकर म्हणाले, आपल्याला विज्ञानातून जे काही कळले ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्यातूनच मी लिहीत गेलो. विज्ञान हे अफाट आहे, त्याची पूर्ण माहिती असलेला महाभाग आज एकही नसेल. असे सांगत शास्त्रज्ञांनी समाजप्रबोधन करावे, विज्ञानाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या विद्यार्थ्यांपुढे मांडाव्यात जेणेकरून विज्ञानाची आणि गणिताची भीती वाटणार नाही, असे आवाहन केले. वैज्ञानिकांचे एक सामाजिक कर्तव्य असते, ते म्हणजे आपण समाजाला देणे लागतो हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही नारळीकर म्हणाले.

अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कल कमी असल्याबद्दल त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे कसा कमी आहे, यासाठी काही दाखले देत त्यांनी त्या विषयीचे महत्त्व पटवून दिले. पेशवाईच्या काळातील एक किस्सा सांगताना ते म्हणाले, बनारस म्हणजे काशी जवळ करमला नदीवर त्यावेळी एक पूल बांधण्याचे काम करण्यासाठी एका भोंदू बाबाकडून अनुष्ठान आणि यज्ञ करून घेण्यात आले. मात्र, तो पूल पूर्ण होऊ शकला नाही. नंतर एका ब्रिटिश इंजिनियरने ते काम पूर्ण केले, असा किस्सा सांगत त्यांनी विज्ञानाचे महत्व पटवून दिले.

हेही वाचा -'अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात संविधानाची प्रस्तावना वाचली जावी'

दरम्यान, डॉ बाळ फोंडके यांनी नारळीकर यांच्या कार्याचा गौरव करताना संत ज्ञानेश्वर यांनी केलेल्या ज्ञानेश्वरीच्या कार्याची उपमा दिली. सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीतून भगवद्गीता कळली. त्याचप्रमाणे नारळीकर यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून मराठीतून विज्ञान सर्वसामान्यांसाठी आणले, असे उद्गार फोंडके यांनी काढले. तर मुकुंद मराठे यांनी नारळीकर यांच्या सोबत आपणही कसे घडलो, याची माहिती दिली.

हेही वाचा -केवळ गांधी आडनाव लावून कोणी 'गांधी' होत नाही - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details