मुंबई -अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोण निर्माण करण्याचा बदल १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा, अशी अपेक्षा १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाच्या अध्यक्षांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने मिळल्यानेच आपण ते स्वीकारले. या पदासाठी निवडणूक घेऊन निवडून यायचे असते तर, आपण त्यासाठी नकार दिला असता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 'तसं माझा मराठी रंगभूमीशी फारसा संबंध उरलेला नाही कारण शेवटचं 'पडघम' हे नाटक मी १९८५ साली केलं होतं'. लहानपणी सोलापूरमध्ये असताना संगीतकार रा.ना.पवार यांनी आपल्याला आचार्य अत्रे यांच्या 'मी उभा आहे' या नाटकात काम दिले. वयाच्या आठव्या वर्षी रंगभूमीवर पाय ठेवल्यानंतर मिळलेली पहिली टाळी आणि दाद आजही माझ्या लक्षात आहे, असे जब्बार यांनी सांगितले.
एकवेळ कॅमेरा हातात असताना आपण संपूर्ण विश्व दाखवू शकतो. मात्र, ४०-४० च्या रंगभूमीवर तुम्ही नाटक कसे जिवंत करता हे जास्त महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या आयुष्यात मी फार नाटकं केली नाहीत, जेमतेम ८ ते १० नाटक केली. पण, जी नाटक केली त्यात कायम काहीतरी वेगळे शोधण्याचा प्रयत्न केला. मुंबईत फारच कमी वेळा इतर भाषेतील नाटक येतात, आणि ती पहिलीच पाहिजेत यासाठी मराठी तरुण-तरुणीकडे आग्रह केला जातो. आज अनेकवेळा तरुण चांगल्या विषयावर नाटक करत असूनही तालमीला जागा मिळत नाही, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
आज डॉ. लागू, निळू फुले, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे असते तर मला फार आनंद झाला असता. मी १०० व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असताना त्यांची प्रतिक्रिया कशी राहिली असती ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.