मुंबई - मराठी भाषा विकास आणि संवर्धनसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य प्रा. डॉ. दिपक पवार यांनी केले. मराठी भाषा दिनाच्यानिमित्ताने मराठी अभ्यास केंद्र आणि वी. ग. वझे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे, भाषाविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचा आमचा विचार असल्याचे पवार म्हणाले. त्या दृष्टीने मराठी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये प्रयत्न करत असून या नावाने आम्ही प्रयोगशील शिक्षक पुरस्कार दिला.
शिवाजी आंबुलगेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यांमधले शिक्षक आहेत. त्यांनी आदिवासी समाजातल्या बंजारा समाजाच्या मुलांसोबत भाषा परिवर्तनाचे काम केले आहे. त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या भाषा शिक्षणाची दखल घेतली आहे.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या संस्थेला शांताराम दातार यांच्या नावाने पुरस्कार दिला आहे. पन्नासहून अधिक वर्ष सीमा भागामध्ये ही संस्था मराठीच्या संवर्धनाचे काम कर्नाटक सरकारच्या विरोधामध्ये जाऊन करत आहे. आमच्या दृष्टीने हे सरकारच्या पुरस्काराचे खरे मानकरी असल्याचे पवार म्हणाले. भाषा विकास आणि संवर्धनासाठी आमच्या कामाची संख्या वाढवून माणसांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले. यावेळी तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मीना गोखले, नितीन वैद्य, मेधा कुलकर्णी सहभागी होते. तर डॉक्टर अनंत देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.