मुंबई : 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो' ही एक अतिशय लोकप्रिय आणि जुनी म्हण आहे. परंतु अनेकदा प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यात यशाचा आधार ठरलेल्या महिलांचे, विशेषतः त्यांच्या जीवनसाथींचे योगदान कमी-अधिक प्रमाणात विसरले जाते. काही वेळेस ते लक्षातही ठेवले जाते, असेच एक उदाहरण म्हणजे, संविधान निर्माते आणि भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर हे दाम्पत्य होय.
रमाबाईंचा जन्म व बालपण :रमाबाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ होता. रमाबाईंचा विवाह १४ वर्षीय भीमराव आंबेडकर यांच्याशी १९०६ मध्ये वयाच्या ९व्या वर्षी झाला. वयाच्या ९व्या वर्षापासून सुरू झालेली संघर्षातील भागीदारीची ही प्रक्रिया ९ मे १९३५ रोजी रमाबाईंच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू होती. बाबासाहेबांनीही रमाबाईंचे आपल्या जीवनातील योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. रमाबाईंनी त्यांचे पती डॉ. आंबेडकरांना प्रत्येक संघर्षात पूर्ण साथ दिली. शेणाच्या गौऱ्या घरोघरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न रमाबाई करत असत, त्या इतरांच्या घरी काम करून बाबासाहेबांच्या शिक्षणाचा खर्च भागवत असे.