मुंबई -दादर हिंदू कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे निवासस्थान असून मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी या इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली आहे. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेने आंबेडकरी जनतेतून संताप व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, काय आहे राजगृहाचा इतिहास जाणून घ्या...
मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी-बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १५ ते २० वर्षे 'राजगृह'मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.
शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती. पण काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५० हजाराहून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) करण्यात आला.
बाबासाहेबांचे सुरूवातीचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकिल म्हणून ख्याती चोहीकडे पसरली आणि 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचे कार्यालय परळच्या दामोदर हॉल जवळ होते. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरे पडू लागले होते. पुस्तकांची आबाळ होत होती. म्हणून बाबासाहेबांनी स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.