मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित अर्थतज्ञ, शिक्षण तज्ञ, जलतज्ञ, समाज शास्त्रज्ञ ही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले शिक्षण हे अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाविषयी प्रचंड कळवळा, आत्मीयता होती. जोपर्यंत समाज शिकून शहाणा होत नाही, तोपर्यंत समाजाचा उद्धार होणार नाही. तळागाळातल्या जनतेला उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हायची असेल तर, त्यांच्यासाठी महाविद्यालयांची निर्मिती व्हायला पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन होता, अशी माहिती त्यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
बाबासाहेबांचा शिक्षण विषयक विचार, कार्य :समाजातील वंचित, दुर्बल घटकांनी उच्चविद्याविभूषित व्हावे, यासाठी महाविद्यालय निर्माण केले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी वाटत होते. त्यासाठी त्यांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईतील फोर्ट परिसरात महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या बॉम्बे हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या एका हॉटेलच्या जागेवर त्यावेळी बाबासाहेबांनी पत्र्याचे सात वर्ग बांधले होते. या वर्गांमध्ये बाक टाकून त्यांनी शिक्षण सुरू केले. मात्र, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पुरेशी साधनसामग्री, पक्की इमारत नसल्याने अनेक अडचणी येत होत्या.
शत्रू मालमत्तेवर महाविद्यालय सुरू :दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या ताब्यात असलेल्या फोर्ट येथील रिकाम्या झालेल्या दोन इमारती बाबासाहेबांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे शिक्षण कार्यासाठी मागितल्या. या दोन इमारतींचे शुल्क भरून त्यांनी त्या ताब्यात घेतल्या. त्या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयातून कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेच्या शिक्षणासोबतच त्यांनी कायद्याचे वर्गही सुरू केले. बाबासाहेबांनी अत्यंत कमी शुल्क घेऊन विद्यार्थ्यांकडून शिक्षण देणे सुरू केले. कमवा, शिक्षण शिका या तत्त्वावर शिक्षण देणारे सिद्धार्थ महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय होते. विद्यार्थ्यांना सकाळी महाविद्यालयात शिक्षण घेऊन दुपारी नोकरी करण्याची मुभा देण्यात आली होती, अशी माहिती भिमराव आंबेडकर यांनी दिली.