मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यावर संशोधन करण्यासाठी आज (रविवारी) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात त्यांच्या नावाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या कोनशीलेचा शुभारंभ झाला. हे संशोधन केंद्र बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सामंत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर फॉर सोशल जस्टिस या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या कोनशिलेचे उद्घाटनही करण्यात आले.
हेही वाचा -संविधानासोबतच बाबासाहेबांचे देश उभारणीत मोठे योगदान - शरद पवार
लगेचच तातडीने संशोधनाच्या कामकाजाला सुरुवात होईल -
माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, देशातील आणि विदेशातील तरुणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शोध आणि संशोधन करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र महत्त्वाचे पाऊल आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील विद्यार्थीसुद्धा या संशोधन केंद्रात येऊन त्यासाठीचे कार्य बजावतील, संशोधन करतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर संशोधन करायचे आहे, त्यांना येथे येऊन संशोधन करता येणार आहे. या संशोधन केंद्रासाठी मुंबई विद्यापीठाने काही तरतूद केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या केंद्राला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, अशी शाश्वती दिली आहे. त्यामुळे या संशोधन केंद्रात लवकरच पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि त्यानंतर लगेचच तातडीने संशोधनाच्या कामकाजाला सुरुवात होईल, अशी माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली.
...तर पुढील 25 वर्षेही आम्हीच सत्तेत राहू -
भाजप नेत्यांकडून राज्यातील सरकार केव्हाही पाडले जाईल, असे वक्तव्य केले जात आहे. याबाबत विचारले असता सामंत म्हणाले, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी राजकीय वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. मात्र, आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच आहे. इतकेच नाही तर पुढील पंचवीस पंचवीस वर्षसुद्धा आम्हीच सत्तेत राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले, हे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभे राहावे म्हणून आम्ही मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्याला आता यश आले आहे. त्यामुळे हे संशोधन केंद्र लवकरात लवकर उभे राहावे, यासाठी आम्ही याचा पाठपुरावा करून एक दबावगट म्हणून त्यासाठी काम करत राहू असे त्यांनी सांगितले.