मुंबई Doubling Of Project Cost - पश्चिम उपनगरातील दहिसर भाईंदर उन्नत मार्ग या रस्त्याच्या कामासाठी गतवर्षी जून महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या निविदा प्रक्रियेला त्यावेळी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या मार्गासाठी सोळाशे कोटी रुपयांचा अंदाजित खर्च महापालिकेने प्रस्तावित केला होता. मात्र, त्याला कोणत्याही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर महापालिकेने दुसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया राबवली. तेव्हा 2527 कोटींवर या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च पोहोचला होता. यावेळीही निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. यात निविदा प्रक्रिया स्तरावरच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या संदर्भात महापालिकेने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया -दहिसर भाईंदर उन्नत मार्गासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी या मार्गाचा अंदाजीत खर्च हा 4000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे केवळ टेंडर प्रक्रिया राबवत असताना कोणतेही काम सुरू नसताना खर्चात दुपटीने कशी वाढ झाली, असा प्रश्न महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. एखादा प्रकल्प कागदावर असताना त्या प्रकल्पाची एकही वीट रचली गेली नसताना प्रकल्पाच्या खर्चात दुपटीने वाढ होणं हे संशयास्पद आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झाला असल्याची दाट शक्यता असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे.