मुंबई -आयकर विभागाने दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत. कर चोरी केल्याच्या संशयावरून हे छापे मारण्यात आले आहेत. दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील विविध ठिकाणच्या कार्यालयांवर धाड टाकून हा आयकर विभागाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. फक्त ते आपल्या विरोधात आहेत म्हणून अशा प्रकारचे छापे टाकणं हे चुकीचं आहे. ते सत्य बाहेर आणतात म्हणून अशा प्रकारच्या धाडी टाकणार हे देशाच्या परंपरेला शोभत नाही असा टोला माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया छापे टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून झालेल्या गैरव्यवस्थापनाची सत्य परिस्थिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न दैनिक भास्कर समूहाने केला. गंगा किनाऱ्यावरील कोरोना मृतांच्या प्रेतांचा खच, मध्य प्रदेशात एकाचवेळी जळणाऱ्या शेकडो चिता यासंदर्भातील छायाचित्र प्रसिद्ध करून भाजपशासित राज्यातील कोरोना महामारीचे वास्तव सर्वांसमोर आणले. गेली वर्षानुवर्षे ते स्वाभिमानाची पत्रकारिता करत आहेत. अशाप्रकारे दहशतवादी असल्यासारखे त्यांच्या घरी छापे टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भास्कर आणि भारत समाचार या दोन्ही वृत्तपत्रामध्ये त्यांना मी पाहतोय. ते एक प्रामाणिक पत्रकारिता करत आहेत.
आणीबाणीमध्ये मार्मिकला देखील टाळे -
गंगेतून वाहणारी प्रेत ही सर्वात मोठी बातमी त्यांनीच दिली होती. त्यामुळे पूर्ण देशाला सत्य माहित पडलं. देशातील बेरोजगारी बद्दल खरे आकडे त्यांनी सांगितले. सरकार कोरोना बाबत आकडे लपवते याची माहिती त्यांनी वृत्तपत्र द्वारे दिली. सरकारने वृत्तपत्राची स्वतंत्र टिकवून ठेवून हे लोकशाहीच्या प्रमुख स्तंभ म्हणून हे सर्वांचे कर्तव्य आहे. अशी कारवाई करून कोणाला वाटत असेल की आम्ही दहशत निर्माण करू शकतो तर ते भ्रमात आहेत आणीबाणीमध्ये आमच्या मार्मिक ला देखील टाळे लागले होते. तेव्हा सर्वात मोठी क्रांती झाली. जर भारतवृत्त समूह बाबत काही तक्रारी असतील तर नक्कीच चौकशी झाली पाहिजे. पण फक्त ते आपल्या विरोधात आहेत म्हणून अशा प्रकारची छापे टाकणं हे चुकीचा आहे. ते सत्य बाहेर आणतात म्हणून अशा प्रकारच्या धाडी टाकणार हे देशाच्या परंपरेला शोभत नाही असे राऊत यांनी सांगितले.