मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार घेण्यासाठी उत्तर प्रदेशवरून तीन महिन्याचा प्रिन्स भरती होता. रुग्णालयात झालेल्या शॉकसर्किटनंतर प्रिन्सचा हात, चेहरा, छातीचा भाग जळाला. त्याचा एक हातही कापण्यात आला. केईएम रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे प्रिन्सला आयुष्यभर दिव्यांगाचे जीवन जगावे लागणार आहे. त्याचा एक हात कापला आहे. तो आयुष्यात काय करेल, असा प्रश्न उपस्थित करून पालिकेने त्याच्या भविष्याबाबत काही तरी चांगला विचार करावा, असे आवाहन प्रिन्सचे वडील पन्नालाल राजभर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी नेमके त्या दिवशी काय झाले याची माहिती 'ई टीव्ही भारत'ला दिली.
प्रिन्सचे वडील पन्नालाल राजभर प्रिन्सचे वडील पन्नालाल राजभर यांना घेऊन काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. यावेळी राजभर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही उत्तर प्रदेशच्या महू जिल्ह्यातील आहोत. मागील महिन्याच्या २२, २३ तारखेला मला माझ्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे माहीत पडले. याबाबत माझ्या मेव्हण्याने मला मुंबईत बोलावल्यावर मी मुंबईत माझ्या मुलाच्या उपचारासाठी आलो. ६ नोव्हेंबरला माझ्या मुलाला केईएम रुग्णालयात उपचारासाठी अॅडमीट करण्यात आले. ७ नोव्हेंबरला दोन अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या उपचार सुरू असलेल्या बेडवर अचानक आग लागली.
आग लागल्यानंतर एक तासाने डॉक्टरांकडून मला तुमच्या मुलाच्या बेडवर आग लागली होती. त्यात तुमच्या मुलाचा हात जळाला आहे. प्लास्टिक सर्जरी करून त्याचा हात नीट होईल असे सांगण्यात आले. त्यावेळी आम्ही मुलावर उपचार नीट करा नंतर आम्ही आमच्या गावी जाऊ असे सांगितले. चार दिवसानंतर हाडांचे डॉक्टर आले आणि त्यांनी मुलाचे ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यांनी माझ्या सह्या घेऊन ऑपरेशन केले. त्यानंतर माझ्या मुलाला आयसीयूमध्ये ठेवले आहे. जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करून प्रिन्सवर उपचार करू असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. माझ्या मुलाचा एक हात कापला असून त्याचे डोके आणि छाती जळाली आहे. त्यामुळे त्याला आयुष्यभर दिव्यांगाचे जीवन जगावे लागणार आहे. आम्ही एका आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईत आलो होतो. मात्र आमच्या मुलाबरोबर दुसराच प्रकार घडला आहे. यामुळे माझ्या मुलाचे भविष्य उद्धवस्त होऊ देऊ नका, असे आवाहन राजभर यांनी केले आहे.
रुग्णाच्या पालकांना १० लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी-
दरम्यान याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत पडसाद उमटले आहे. पालिका प्रशासनाने रुग्णालयामधील दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. स्थायी समितीत प्रिन्सच्या कुटुंबीयांना दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर प्रशासनाकडून काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. यामुळे नुकसान भरपाईबाबत पालिकेने पॉलिसी बनवण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.