महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही - मुख्यमंत्री - देशव्यापी बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री संपूर्ण देश लॉकडॉऊन करण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री

By

Published : Mar 25, 2020, 8:09 AM IST

मुंबई - पंतप्रधानांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

पंतप्रधानांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केल्याच्या काही ठिकाणी निदर्शनास आले. त्यानंतर मी स्वत: पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली, की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. पंतप्रधानांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली, यासंदर्भात आपल्याला माहिती दिली. तसेच आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले, असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, औषधी, दूध, भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. यामालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरू राहील याची खात्री बाळगा.

व्हॉटसअॅप ग्रुप -
नागरिकांना कोरोनाविषयक अधिकृतरित्या माहिती मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसएप चॅटबॉट ग्रुप सुरू केला आहे. नागरिक याचाही लाभ घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही मिळेल, असेही ते म्हणाले.
परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे, लपवायची नाही. कारण या साथीची लागण होण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details