मुंबई- लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी ओढावल्याने घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दहा हजाराची मदत करण्याची मागणी करत घरेलू कामगार महिलांनी आंदोलन केले. यावेळी सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेतर्फे पंचवीस हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला.
लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अशाच प्रकारे मुंबईमध्ये घरकाम करणाऱ्या महिलादेखील गेल्या चार महिन्यापासून बेरोजगार असून लॉकडाऊनमुळे त्यांच्या चारितार्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सरकारने या महिलांना दरमहा दहा हजार रुपये मदत करावी अशी मागणी घरेलू कामगार संघटनेने केली आहे. सावित्रीबाई घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनापत्र पाठवण्यात आले. चेंबूर येथील पोस्ट ऑफिसबाहेर महिलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यासाठी मोठी गर्दी केली होती.