मुंबई - पश्चिम बंगाल येथे एका सहाय्यक डॉक्टरला मारहाण झाली होती. यासंदर्भात मारहाण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करत मुंबईतील सायन, जे. जे. व नायर रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला आहे. यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.
पश्चिम बंगालमधील सरकारी रूग्णालयात डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. १० जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तेथील डॉक्टरांनी संप पुकारला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना कामावर रुजू व्हा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतरही डॉक्टरांनी संप सुरुच ठेवला. त्या संपाला दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारुन या आंदोलनाला समर्थन दिला आहे.