मुंबई : मुंबईतील कोरोना महामारी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांना पंजाबच्या अमृतसर विद्यापीठाकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी (D.Sc) प्रदान करण्यात आली आहे. या आधी चहल यांना पंजाब येथील थापर इन्स्टिट्युटकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. पालिकेने कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ठ कामाची ही पोचपावती असल्याचे चहल यांनी म्हटले आहे. (Doctorate to Mumbai Municipal Commissioner)
धारावी मॉडेल : जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. या विषाणूचा पहिला रुग्ण मुंबईत मार्च २०२० मध्ये आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. मुंबई आणि जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. अशावेळी मे २०२० मध्ये इकबाल सिंग चहल यांची पालिका आयुक्त म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली. मुंबई मॉडेल, धारावी मॉडेल याची जगभरात दखल घेण्यात आली. यामुळे मुंबईतील कोरोना आटोक्यात आला आहे.
गुरु नानक देव विद्यापीठाची डॉक्टरेट :पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना नुकतीच पंजाब अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठाची मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी (D.Sc) प्रदान करण्यात आली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली. मुंबईतील कोविड महामारी व्यवस्थापनातील जागतिक स्तरावर प्रशंसनीय कामगिरी आणि समाजासाठी अतुलनीय योगदानाबद्दल चहल यांना ही पदवी देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. डॉक्टरेट मिळाल्याने मी खरोखरच धन्य आणि सन्मानित झालो आहे. मी ही पदवी माझ्या टीम बीएमसी आणि महाराष्ट्र सरकारला समर्पित करतो, असेही चहल यांनी म्हटले आहे.
थापर इन्स्टिट्युटकडून डॉक्टरेट : मुंबईतील कोरोना महामारी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इकबाल सिंग चहल यांना पटियाला (पंजाब) येथील थापर इन्स्टिट्युटकडून डॉक्टर ऑफ सायन्स (ऑनॉरिस कॉसा) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. थापर इन्स्टिट्युटची 1956 मध्ये स्थापना झाली आहे. ही इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी, संशोधन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात अग्रणी आहे आणि जगभरात 25000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी या संस्थेचे आहेत. तीन दशकांपूर्वी, या संस्थेने 1994 मध्ये आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डॉक्टर ऑफ सायन्सची अशीच पदवी प्रदान केली होती. या इन्स्टिट्युटची डॉक्टरेट मिळवणारे चहल हे पहिले माजी विद्यार्थी आहेत.