मुंबई- कोरोनाच्या भीतीने म्हणा वा सुरक्षा साधने मिळत नसल्याने खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळी एक खासगी डॉक्टर संभाव्य कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी पुढे आले आहेत. या डॉक्टरने आपले 100 बेडचे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेला क्वारंटाईनसाठी दिले आहे.
हे डॉक्टर चेंबूरमधील असून त्यांचे नाव रॉय पाटणकर असे आहे. डॉक्टर पाटणकर हे पोटविकार तज्ज्ञ असून ते गेली 25 वर्षे प्रॅक्टिस करत आहेत. चेंबूरमध्ये त्यांचे प्रसिध्द 100 बेडचे झेन हे हॉस्पिटल आहे. तर चेंबूरमध्येच जॉय नावाचे ही त्यांचे एक 100 बेडचे हॉस्पिटल आहे. मात्र, काही कायदेशीर अडचणीमुळे हे हॉस्पिटल मागील तीन वर्षांपासून बंद आहे.
आता मुंबईत कोरोनाचा शिरकाव झोपडपट्टीमध्ये झाला आहे. त्यामुळे मुंबईतील संभाव्य आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने संभाव्य रुग्णांना क्वारंटाईन करावे लागणार आहे. अशावेळी मुंबईत जागा अपुरी पडण्याचीही शक्यता आहे. हाच विचार करत आपल्याकडून काही मदत म्हणून डॉ. पाटणकर यांनी आपले बंद जॉय हॉस्पिटल पालिकेला क्वारंटाईनसाठी दिले आहे.
शनिवारी त्यांनी हॉस्पिटल पालिकेला दिले आहे. धारावी झोपडपट्टीत लोक कोणत्या परिस्थिती राहतात, हे काही सांगायला नको. अशावेळी येथील संभाव्य रुग्णांना योग्य प्रकारे क्वारंटाईन करण्याची गरज आहे. म्हणूनच आपण हे हॉस्पिटल दिल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले आहे.