महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 24, 2020, 4:25 PM IST

ETV Bharat / state

'कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये, कारण नसताना घराबाहेर पडू नये'

राज्यात संचारबंदी आहे, १४४ कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही, उगाचंच घर सोडायचं नाही. अत्यावश्यक असेल त्यांनीच तेवढया पुरते बाहेर पडून घरात परत यायचं आहे. काळजी घ्यायची ही सरकारची भूमिका आहे. अनेक लोकं नियम पाळण्याचा प्रयत्न करत असून काही सुशिक्षित वर्गच बाहेर पडत आहे, हे थांबलं पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार
माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे. तुमच्या माझ्या देशावर पहिल्यांदाच संकट आले असल्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यायची हे कळत नाही. परंतु जसजसा एक-एक दिवस जाईल यामध्ये स्थिरता येईल. लोकांना समज येईल व लोकं काळजी करायला लागतील, प्रतिसाद देतील. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये आणि कारण नसताना घराबाहेर पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी जनतेला दिल्या आहेत.

माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

आज(मंगळवार) मंत्रालयात मुख्य व उपमुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार रोज सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता मुख्य व उपमुख्य सचिव हे वेगवेगळ्या खात्यातील सचिवांसोबत बैठक घेत आहेत. त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा आढावा घेत आहेत. कोरोनाबाबत जी खाती अहोरात्र काम करत आहेत त्या कर्मचार्‍यांचे चेक पास करून घेतले जात आहेत. किंवा त्यांना आर्थिक अडचण येवू नये याबाबतची माहिती घेतली जात आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आपल्यातील काही लोक बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून खूप मोठी गर्दी करत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांचा तयार झालेला माल आणणं व तो ग्राहकापर्यंत पोचवणं, जीवनावश्यक वस्तू पोचवणं यामध्ये सरकार बारकाईने लक्ष देत आहे. परंतु कधी-कधी पोलीस विभागातील अधिकारी दिसेल त्याला मारत आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवा पुरविणारा जो कर्मचारी आहे, व्यापारी आहे त्यांना त्रास होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. यावेळी श्रीगोंदा व मराठवाडा येथून तक्रारी आल्या आहेत, असं करून सर्वांचेच नुकसान होत आहे.

राज्यात संचारबंदी आहे, गर्दी कमी करायची आहे. १४४ कलम लावण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही. उगाचंच घर सोडायचं नाही. अत्यावश्यक असेल त्यांनीच तेवढया पुरते बाहेर पडून घरात परत यायचं आहे. काळजी घ्यायची ही सरकारची भूमिका आहे. अनेक लोकं नियम पाळण्याचा प्रयत्न करत असून काही सुशिक्षित वर्गच बाहेर पडत आहे, हे थांबलं पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

औषधे व फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसे जावू नये. सरकारी दवाखाने आहेत. खाजगी दवाखान्यांनी प्रतिसाद दिला आहे. मेडिकल कॉलेज आहेत तिथे तपासणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय खाजगी दवाखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात दिवसभरात साधारण २ हजार लोकांची तपासणी होवू शकते, अशी व्यवस्था करण्यात आली आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा -'काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकणार'

नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये खरेदीसाठी लोकं गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दी पाहून २-३ तासातच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याच्या सूचना कराव्यात अशा सूचना तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. सकाळी ८ ते ११ वाजता घरातील एकाने बाहेर पडून खरेदी करावी, जेणेकरून गर्दी आटोक्यात आणता येईल. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे ती सर्वांनी द्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

काही लोक साठे करून पैसे कमावण्याचा धंदा करत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. अशाप्रकारे कोण चुकीचे वागत असेल तर त्यांना वेळप्रसंगी जेलमध्ये टाकण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा -यंदा पाडव्यावर कोरोनाचे सावट; गिरगावातील प्रसिद्ध गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details