मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणात राज्य गृह विभाग आणि महाराष्ट्र सत्ताधारी यांची देखील सीबीआयद्वारे चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.
माहिती देताना आमदार भातखळकर अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्स माफिया, बॉलिवूड आणि राजकीय नेते यांचे संबंध समोर येत आहेत. सुशांत प्रकरण महाराष्ट्र पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आलेले आहे. मात्र, २ महिने सुशांत प्रकरणाची चौकशी व तपास मुंबई पोलीस करत होते. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. सुशांतच्या मृत्यूनंतर ३ तासाने गृहमंत्र्यांनी ही आत्महत्या आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतरही त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. यातून स्पष्ट होते की, या प्रकरणात कोणतीही गडबड नाही असे त्यांना दाखवायचे होते. ती आत्महत्याच आहे, असे वारंवार महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनुसार केली, असे माझे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांनी राजकीय दबावात येऊन सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर देखील दाखल केले नाही. चौकशी करत आहोत असे नाटक पोलिसांनी केले. धक्कादायक हे आहे की, या प्रकरणात जे संबंधित नव्हते व होते, असे सिनेसृष्टीतील कलाकार यांचाच फक्त जबाब घेऊन चौकशी करण्यात आली. ज्यावेळेस सिनेसृष्टीतील कलाकार पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी जात होते, त्यावेळेला राजकीय नेतेमंडळी यांनी पोलिसांवर, जबाब नोंदवू नका व आम्ही सांगितल्यानुसारच जबाब घ्या, असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ही माहिती आम्ही सीबीआयला द्यायला तयार आहोत, असेही भातखळकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
त्याचरबरोबर, या प्रकरणात बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते आणि ड्रग्स माफिया यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत होते. त्यामुळे, महाराष्ट्र गृह विभाग आणि राजकीय सत्ताधारी यांची देखील सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी गृह मंत्री अमित शहा यांना केली आहे.
हेही वाचा-पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीकर एकवटले; आता लढणार दुहेरी लढाई