मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ( Azadi ka Amrit Mahotsav ) निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ( Brihanmumbai Municipal Corporation ) घरोघरी तिरंगा अभियान राबवताना संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा विद्युत रोषणाई ने झळाळून निघाले होते. त्याला मिळालेला मुंबईकरांचा प्रतिसाद लक्षात घेता, दीपावली सणाच्या निमित्ताने दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर २०२२ या एका आठवड्याच्या कालावधीसाठी मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, वाहतूक बेटं इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
आढावा बैठक :मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प ( Mumbai Beautification Project ) तसेच दीपावली निमित्ताने मुंबई महानगरात करावयाची विद्युत रोषणाई या कामांचा आढावा महानगरपालिका आयुक्त प्रभारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे आश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रकल्प पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, सहायक आयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.
डॅशबोर्ड संगणकीय प्रणाली :मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत करावयाच्या कामांसाठी ठिकाणे निश्चित करुन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मागील आढावा बैठकीत दिले होते. त्याअनुषंगाने मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याची कार्यवाही वेळेवर होईल अशा दृष्टीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन लवकरात लवकर कामे सुरु करावीत, सर्व कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड स्वरुपातील संगणकीय प्रणाली देखील माहिती तंत्रज्ञान खात्याडून उपलब्ध करुन दिली जात असून त्यामध्ये माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.
आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करा :घरोघरी तिरंगा अभियानामध्ये मुंबई महानगरात केलेल्या विद्युत रोशणाईची मुंबईकरांनी वाखाणणी केली. नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा हातभारही लागला. त्याच धर्तीवर दीपावली निमित्त मुंबई महानगरातील महत्त्वाची व अधिकाधिक नागरिकांच्या दृष्टीक्षेपात असणारी सार्वजनिक स्थळं, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटं इत्यादी ठिकाणी विभाग कार्यालयांच्या माध्यमातून २२ ते २९ ऑक्टोबर २०२२ या एका आठवड्याच्या कालावधीसाठी आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करावी. या कामांसाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला प्रासंगिक खर्च म्हणून निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे स्थळ दरपत्रिका मागवून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले.