मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने सहा महिन्यांपूर्वी यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाइन शिक्षणाने झाली. अजूनही याच पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा सुरू आहेत. कोरोनामुळे शाळा नेमक्या कधी सुरू होतील हे अजूनही स्पष्ट होत नसले तरी शालेय शिक्षण विभागाकडून मात्र कोरोनाच्या काळातही विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळीची सुट्टी दिली जाणार आहे. यासाठीची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काल (मंगळवार) दिली.
राज्यात अद्यापही कोरोनचा कहर सुरूच आहे. अनलॉकनंतर जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असला तरी कोरोनाची दहशत अद्यापही कायम असल्याने राज्यात शालेय शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीचे कार्यक्रम ऑलनालइनच सुरू आहेत. प्रत्यक्षात राज्यातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवण्यात आले आहे. यामुळे यंदा दिवाळीची सुट्टी मिळेल की नाही, असा प्रश्न शिक्षक आणि शिक्षक संघटनांना पडला होता.
दिवाळीत परीक्षांचे आयोजन नको
विद्यार्थी व शिक्षकांसाठी दिवाळीत परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार आहे व त्या संबंधितांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दिवाळीच्या सुट्टीदरम्यान कोणत्याही शाळा आणि व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये, अशा सुचनाही त्यांनी आपल्या विभागाला दिल्या आहेत.