मुंबई Diwali Festival २०२३ : 'दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' असं म्हटलं जातं. दसऱ्यानंतर दिवाळी सण (Diwali) साजरा करण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. दिवाळी सणात नवीन कपडे, घरी आनंदाचे वातावरण, आणि गोडधोड फराळ (Diwali Faral) बनविला जातो. हा गोड फराळ खाण्यासाठी खवय्ये वर्षभर दिवाळीची वाट पाहत असतात. तसेच पंधरा ते आठवडाभर आधीच फराळ बनविण्यासाठी गृहिणींचे लगबग सुरु असते. मात्र या वर्षी फराळ बनविणाऱ्या गृहिणींचे बजेट कोलमडणार असून, दिवाळीत फराळ तयार करायचा की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. याला कारण म्हणजे ऐन सणासुदीच्या व दिवाळीच्या तोंडावर फराळ बनविण्यासाठी जे जिन्नस लागतात. ते म्हणजे डाळी, साखर व कडधान्य यांच्या किंमतीत वाढ (Pulses Increased) झाल्यामुळं याची झळ सामान्य लोकांना बसत आहे. त्यामुळं दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न गृहिणी व सामान्य लोकांसमोर आहे.
मागच्या वर्षापेक्षा यावर्षी १० ते १५ रुपयांनी वाढ: मागील वर्षापेक्षा या वर्षी कडधान्य व डाळींच्या किंमतीत १० ते १५ रुपयांनी वाढ झाल्याचं चित्र आहे. मागील वर्षी ५४ ते ६५ रुपये किलो दराने हरभरा विकला जात होता. या वर्षी हेच दर ६० ते ७५ रुपयांवर पोहोचले आहेत. मूग ८१ ते ११० वरून १० ते १२५ रुपयांवर, उडीद ८२ ते ९० वरून ९५ ते १२० रुपयांवर पोहोचला आहेत. तसेच वाल १६५ वरुन १९० रुपयांपर्यत पोहचला आहे. तसेच फराळ बनविण्यास महत्त्वाचा घटक व जिन्नस म्हणजे साखर. प्रत्येक फराळ तयार करण्यास साखर ही लागतेच. मात्र साखरेचे भाव देखील दिवाळीच्या तोंडावर वाढ झाली आहे. जी साखर आठवड्यापूर्वी ४०-४२ रुपये होती. तीच आता ४६ रुपयांवर गेली आहे. याशिवाय कडधान्यांच्या किंमतीत तेजी आली आहे. यामुळं ऐन सणासुदीच्या काळात डाळी, साखर व कडधान्यांचा किंमती वाढल्यामुळं गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. "आधीच एवढी महागाई वाढली आहे, आणि आता दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर डाळी, साखर व कडधान्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं खर्चाचे गणित जुळवणे कठीण होत आहे. या दरवाढीची झळ एवढी बसत आहे की, सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी करायची की नाही? असा सवाल गुहिणी मिनल पवार यांनी उपस्थित केला आहे.