मुंबई Diwali 2023 wishes:देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.आज लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीसणाच्या पाच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस. हा दिवस सर्वत्र अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. तरी पारंपारिक रीतीनं मित्रपरीवारात, नातेवाईकांत कुटुंबासह हा सण साजरा करण्याची आणि शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. तरी देशातील विविध राजकीय मंडळींकडून एक्स या सोशल मीडियात पोस्ट करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आपल्या अधिकृत ट्वीटर (एक्स) हॅंडलवरुन पोस्ट करत म्हणाले की, प्रकाशाचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्तम आरोग्य घेवून येवो अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी :प्रकाश आणि आनंदाचा महान सण दिवाळीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा महान उत्सव संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करून सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनेतेच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, या आशयाची पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. ते म्हणालेत की, उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी, सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी...लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना आनंदमयी, उत्साही आणि सुरक्षित जावो हीच सदिच्छा, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले.
- उपमुख्यमंत्री अजित पवार :राज्यातील जनतेला, 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजना'च्या हार्दिक शुभेच्छा! वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या या सणासुदीच्या दिवशी घरोघरी ज्ञानाचे दीप जळो, सर्वांचं आयुष्य प्रकाशाने उजळो. सुख-समाधान, समृद्धी, आनंद, धन-धान्य, उत्तम आरोग्य सर्वांना लाभो आणि समाजातील दुष्प्रवृत्तींचा नाश होवो हीच प्रार्थना. शुभ दीपावली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार :नकारात्मकतेचा नाश होऊन आपल्या आयुष्यातील सकारात्मक विचारांना गती मिळो. ही दिवाळी यश, कीर्तीचा आलेख उंचवणारी, प्रगतीच्या दिशा दैदिप्यमान करणारी ठरो, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदिल्या आहेत.
- कॉंग्रेस नेते राहुल गांधी :कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील देशवासियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत. अंधकारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा विजय होवो अशी पोस्ट करत राहुल गांधींनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.