मुंबई -देशात मंदीची लाट आणि माझा काही संबंध नाही, मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. देशातील मंदीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. परिवहन खात्यातून 832 अधिकाऱ्यांची पहिली भरती सरकारमध्ये केली. त्यातील 200जण प्रशिक्षण घेत आहेत. 2 लाख 36 हजार रिक्षा व 33हजार काळी-पिवळी टॅक्सी रस्त्यावर आणल्या. परिवहन खात्यात गेल्या 5 वर्षात 50 हजार नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा दिवाकर रावते यांनी केला आहे. नोकरी गेली तर चिंता असते मंदी वगैरे काही नसते असे ते म्हणाले.
10 रुपयात सकस आहार थाळी ही बचतगटांच्या माध्यमातून गरजू गरीब लोकांना उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठीच आर्थिक नियोजनाचा आराखडा सत्तेत आल्यावर तयार केला जाईल असे परिवहन मंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटले. शिवसेनेची सत्ता गेल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने गरीब लोकांना 1 रुपयात उपलब्ध होणारी झुणका भाकर योजना बंद केली. त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली सैनिकी शाळा अनुदान देणं थांबवून बंद पाडल्या. वृद्धाश्रमांचे सरकारने अनुदान बंद केले. जनकल्याणासाठी लोकांच्या हिताच जे असेल त्या योजना शिवसेना पुढे नेणार, असा विश्वास दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.