मुंबई- गायक सोनू निगम याने टी सिरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी एक व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले आहे.
गायक सोनू निगम याने भूषण कुमार यांच्यावर बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवोदित गायकांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना दिव्या खोसला कुमार यांनी टी सिरीजने कंपनी स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेक नवोदित गायकांना संधी दिली असून अनेकांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवले असल्याचे सांगितले आहे. खुद्द सोनू हा देखील दिल्लीत 5 रुपये मानधनावर राम लीलामध्ये गात होता. तिथून त्यांच्यातील टॅलेंट हेरून दिवंगत गुलशन कुमार यांनी त्याला मुंबईत आणून त्याला अलबम आणि सिनेमात गाण्याची संधी दिली. मात्र, गुलशन कुमार यांचं निधन झाल्यानंतर सोनू याने परस्पर दुसऱ्या म्युझिक कंपनीसोबत करार करून केलेल्या उपकारांची जाणीव ठेवली नाही, असे दिव्या यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
- https://www.instagram.com/tv/CB0jC4hpo81/?igshid=brk11oobgjjg
भूषण कुमार यांनी टी सिरीजची धुरा आपल्या हातात घेतली तेव्हा ते फक्त 18 वर्षांचे होते. त्यांची या इंडस्ट्रीत कुणाशीच ओळख नव्हती. त्यामुळेच त्यांनी हक्काने बाळासाहेब ठाकरे, स्मिता ठाकरे, सहाराश्री सुब्रतो रॉय यांची भेट घालून देण्यास सांगितल्याचे दिव्या यांचे सांगणे आहे. मात्र, अबू सालेमपासून वाचण्यासाठी त्यांना तुमच्याकडे यावे लागले, असे तुमचे सांगणे आहे. यावरून सोनू निगमचेच अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे सिद्ध होत असल्याचा दिव्या यांचा आरोप आहे.