महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना लॉकडाऊन प्रभाव: मुंबईत औषध वितरण व्यवस्था विस्कळीत - Corona Lockdown

औषधांची वाहतूक आणि वितरण करण्यासाठी मनुष्यबळ, वाहने मिळत नसल्याने वितरण व्यवस्था विस्कळीत झाली झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून तसे झाल्यास औषध टंचाईचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो.

Medicine
औषध

By

Published : Apr 5, 2020, 1:57 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य सुविधांना वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही औषध वितरण आणि विक्रीवर या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. कंपन्याकडे औषधांचा मुबलक साठा असूनही वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत.

भिवंडीतून मुंबईतील विविध ठिकाणी औषधांचा साठा आणण्यासाठी 2 दिवसांऐवजी 10 दिवसांचा कालावधी लागत आहे. दरम्यान लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून तसे झाल्यास औषध टंचाईचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती औषध वितरकांनी व्यक्त केली आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने वितरण व्यवस्थेतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी वितरकांनी केली आहे.

लॉकडाऊनची घोषणा झाल्याबरोबर ग्राहकांनी सॅनिटायझर्स, मास्क आणि अत्यावश्यक औषधांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. औषधांची वाहतूक आणि वितरण करण्यासाठी मनुष्यबळ, वाहने मिळत नसल्याने वितरण व्यवस्था विस्कळीत झाली झाली आहे. कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती होत आहे. त्यांच्याकडून औषधे गोदामांपर्यंत पाठवलीही जात आहेत. मात्र, त्यानंतर ही औषधे वितरकांपर्यंत आणण्यात अडचणी येत आहेत.

कोरोनाच्या भीतीने कामगार मिळेनासे झाले आहेत. जे येत आहेत त्यांना अडवले जात आहे, मारहाण होत असल्याने कामगारांनी काम करण्यास नकार दिला आहे. यापूर्वी ऑर्डर दिल्यानंतर भिवंडीवरून 2 दिवसांत औषध साठा येत असे मात्र, आता 10 दिवस वाट पाहावी लागत असल्याची माहिती मुंबई उपनगरातील वितरक हकीम कापसी यांनी दिली.

वितरण व्यवस्थित होत नसल्याने सध्या मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजारांवरील औषधांचा साठा विक्रेत्याकडे कमी झाला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)कडे तक्रार केली आहे. लॉकडाऊन वाढून औषध टंचाई निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी बिघडेल त्यामुळे सरकारने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी कापसी यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details