मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या सभेला मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा हे गैरहजर राहिल्याने संजय निरुपम यांनी त्यांना लक्ष्य करत निकम्मा म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधील त्यांची लाथाळी सुरू राहणार असल्याचे दिसून येते.
मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पुन्हा आपल्याच पक्षातील नेत्यावर ट्विटवरून हल्ला केला. पक्षातील प्रतिस्पर्धी व माजी खासदार मिलिंद देवरा यांना जोरदार लक्ष्य केले. मुंबईत राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या. या सभांना मिलींद देवरा हे गैरहजर होते. त्यामुळे हा मुंबईत मोठा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच मुंबई काँग्रेसमधील धूसफुस संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
हेही वाचा -22 ऑक्टोबरला बँका बंद, कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप
निरुपम यांनी राहुल यांच्या सभांना गैरहजर असल्याबाबत ट्विटरवर खुलासा केला. त्यात त्यांनी ‘माझ्या घरी कौटुंबिक समारंभ होता. त्यात मी दिवसभर व्यग्र होतो. त्यामुळे मी राहुल यांच्या सभांना उपस्थित राहु शकलो नाही. तो नेता माझा आहे, तो मला कायम सारखा असेल’, असे त्यांनी राहुल यांच्या सदंर्भात म्हटले आहे.
मात्र, त्याच ट्विटमध्ये निरुपम यांनी ‘तो निकम्मा कुठे होता?’ असा सवाल केला आहे. अर्थात ‘निकम्मा’ म्हणजे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा हे होते. कारण देवरा यांच्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत निरुपम यांना मुबई अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. याविषयी मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना विचारणा केली असता, निरुपम कौटुंबिक कार्यामुळे राहुल यांच्या सभांना येऊ शकले नाहीत. त्यांनी तसे मला कळवले होते. मात्र, निकम्मा कोण याविषयी गायकवाड म्हणाले ‘मी निरुपम यांचे ते ट्विट वाचलेले नाही’. यावर काहीही अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
हेही वाचा -मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे