मुंबई- सोमवारी युतीची घोषणा झाली तरी मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. चल फूट माझ्या मतदारसंघातून, मागाठाणेत फक्त शिवसेनाच, अशा आशयाचे व्यंग शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून त्यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध केला आहे.
विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यालयाबाहेर भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्राचा निषेध केला. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उमेदवारी अर्ज भरायला जाताना भाजप कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांना अडविले. युतीची उमेदवारी प्रकाश सुर्वेंना मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तसेच प्रवीण दरेकर यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसून आला.