मुंबई Dispute In NCP:गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून अनेक भाविक भक्त आपल्या घरात बाप्पाला विराजमान करत असतात. तसंच अनेक राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पूजा आणि आरतीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील दुष्काळाचे निराकरण व्हावे, अशी अपेक्षा बाप्पाचरणी पाटील यांनी व्यक्त केली आहे. गणरायाची ख्याती बुद्धिमत्तेवर आहे, सर्व राजकारण्यांना देव सुबुद्धी देवो. तसंच फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना देखील सुबुद्धी देवो, अशा प्रकारची प्रार्थना जयंत पाटील यांनी गणरायाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाला शरद पवारांचे उत्तर :६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला शरद पवारांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची फूट नाही. आमच्यात कोणताही वाद नाही. माझ्या ध्येयधोरणाला कोणत्याही प्रकारे कोणीही विरोध केलेला नाही. माझी निवडणूक हजार लोकांच्या उपस्थितीत पार पडली आहे. तुमच्याकडे काही पत्रव्यवहार झाला असेल तर आम्हाला वेळ द्यावा. त्यासाठी आम्ही भेटायला तयार असल्याचं शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला म्हटलं आहे. ती वेळ न देता वाद आहे, असे सांगून फायनल करणं हे अन्यायकारक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.