मुंबई : राज्या समोर असलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी ( Governor Bhagat Singh Koshari ) यांची सोमवारी भेट घेतली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde group ) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारच्या गेल्या तीन महिन्याच्या काळात पाच मोठे प्रकल्प गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये गेले. राज्यातील प्रकल्प बाहेर जाणे शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अद्यापही भरपाई न मिळणे. तसेच राज्यात सुरू असलेल्या राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे राज्यपालांनी राज्य सरकार बरखास्त करावे असे निवेदन काँग्रेसच्या नेत्यांकडून राज्यपालांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले( Congress state president Nana Patole ), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Former Minister Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister Prithviraj Chavan ) हे उपस्थित होते.
ओला दुष्काळ जाहीर केला नाही : राज्यासमोरील संकटाकडे आणि जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका, उडीद ही सर्वच पीके शेतक-यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने वाढवली, त्याला खते आणि कीटकनाशके यासाठी मोठा खर्चही केला होता. मात्र पीके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतकऱ्यांना मदतही दिली नाही असा आरोप नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लावला.
राज्यातून प्रकल्प गुजरात मध्ये जात आहेत : गेल्या तीन महिन्यात १.५४ लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन, ३ हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क, आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून राज्यातील बेरोजगारांना मिळणारे रोजगारही हिरावले गेले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. लाखो पदे रिक्त असतानाही सरकार नोकरभरती करत नाही. राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जात आहेत त्यामुळे खासगी क्षेत्रातही रोजगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे राज्यातील तरुण हताश आणि निराश झाले असल्याचे यावेळी काँग्रेस नेते म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले, शिंदे-फडणवीस यांनाही घेऊन जा :महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक गुजरातमध्ये जात होती तेंव्हा शिंदे फडणवीस सरकार काय झोपा काढत होते का ? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. राज्यातल दोन लाख कोटींची गुंतवणूक व लाखो रोजगार गुजरातला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन पाळले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोकळ दावे करत आहेत. मोठे प्रकल्प गेले आणि त्या बदल्यात आलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकारचे आभार कसले मानता ? दोन वर्षात महाराष्ट्रात काहीच झाले नाही असा आरोप करत सर्व खापर महाविकास आघाडीवर फोडत आहेत.
दिल्लीतील वरिष्ठांच्या इशाऱ्यावर खाली मान घालून गप्प :फॉक्सकॉन मविआच्या काळातच गुजरातमध्ये गेला दावा करणाऱ्या फडणवीसांनी, १५ जुलै २०२२ रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक कशासाठी घेतली होती याचा खुलासा करावा. फडणवीस व भाजपाने मोदी सरकारकडे जाऊन महाराष्ट्राची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली पाहिजे यासाठी काय प्रयत्न केले ते सांगावे. दिल्लीतील वरिष्ठांच्या इशाऱ्यावर खाली मान घालून गप्प बसतात आणि खोटे बोल पण रेटून बोल, या पद्धतीने वागत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले. तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याच्य़ा निषेधार्थ राजभवनसमोर, ‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले, शिंदे फडणवीस यांनाही घेऊन जा, महाराष्ट्र सुखी होईल अशा आशयाचे फलक यावेळी झळकवण्यात आले.