मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व ईडीकडून तपास केला जात आहे. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिच्याबाबत समजा माध्यमांवर काही गोष्टी व्हायरल होत आहेत. दिशाने आत्महत्या करण्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष 100 क्रमांकावर कॉल केला असल्याचा उल्लेख समाज माध्यमांवर सतत होत आहे. मात्र, दिशाच्या मोबाईल फोनवरून पोलीस नियंत्रण कक्षाला अशा प्रकारचा संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.
दिशा सॅलियनने आत्महत्येपूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क केला नाही - मुंबई पोलीस - Mumbai police on Disha Salian
अभिनेता सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने ८ जूनला आत्महत्या केली. त्यानंतर सुशांतनेही आत्महत्या केली. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान दिशाबाबत अनेक अफवा समाज माध्यमांवर पसरत आहेत. मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणात एक स्पष्टीकरण दिले आहे.

दिशाने आत्महत्या करण्यापूर्वी तिची मैत्रीण अंकिता हिला फोन करण्याचा प्रयत्न केला होता, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दिशाने 8 जूनला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर 14 जूनला सुशांतसिंहने त्याच्या वांद्र्यातील घरात आत्महत्या केली.
दरम्यान, 14 ऑगस्टला दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रारकरून दिशाच्या मृत्यू संदर्भात समाज माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी जी काही पावले उचलली आहेत आणि जो तपास केलेला आहे, त्याबद्दल आम्हाला कुठलीही तक्रार नसल्याचे सतीश सॅलियन यांनी म्हटले आहे. दिशाच्या संदर्भात बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरत असल्यामुळे दिशाचे वडील सतीश यांनी तक्रार नोंदवली होती. काही राजकारण्यांकडून या गोष्टीचे राजकारण केले जात असल्याचेही त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले होते. मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी ही तक्रार दाखल केली होती.