मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचे राजकारण तापले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या डिग्रीचा विषय लावून धरल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील विरोधी पक्षांची एकजूट करणारे नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांना खडसावले. मोदींच्या डिग्रीपेक्षा देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा व्हायला हवी, अशा कानपिचक्या देखील दिल्या.
अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावरून खडे बोल सुनावत 25 हजाराचा दंड ठोठावला. सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदींच्या डिग्रीची खिल्ली उडवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, कोणतेही महाविद्यालय मोदींना डिग्री दिली हे सांगायला गर्वाने पुढे येणार नाही, असा खोचक टोला लगावत चौफेर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकार परिषदेत छेडले असता, पवारांच्या रागाचा पारा वाढला. महागाई, बेरोजगारी, गरिबी यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आहेत. यावर लक्ष देऊन चर्चा घडवून आणायला हवी. अनावश्यक मुद्द्यांवर कधीही चर्चा होऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे आणि केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.