मुंबई- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व क्षेत्रावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. मात्र, त्याचवेळी आता अत्यावश्यक, त्यातही आरोग्य क्षेत्रातीलच औषध वितरणावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि औषध साठेबाजीमुळे औषध वितरण व्यवस्था सध्या काही अंशी विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती पुढेही अशीच राहिली, तर औषध टंचाईचे संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईसह राज्यभरातील औषध दुकाने सुरू आहेत. सध्या मास्क, सॅनिटायझर्सची मागणी मोठी आहे. पण त्याचवेळी इतर आजारांवरील औषधांचीही विक्री वाढती आहे. लॉकडाऊन पुढेही असेच सुरू राहिले तर औषधे मिळणार नाहीत, असे म्हणत नियमित लागणाऱ्या औषधाची साठेबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक औषधनिर्मिती कंपन्यामधील कामगार कामावर येत नसल्याने उत्पादनावर परिमाण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या कंपन्या औषध निर्मिती करत आहेत, त्यांना औषधांची वाहतूक करण्यासाठी वाहने आणि कर्मचारी मिळत नसल्याचे चित्र आहे.