मुंबई Disabled Carried Second Floor :इमारतीत लिफ्ट नसल्यानं एका दिव्यांग महिलेला लग्नासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उचलून न्यावं लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. विराली मोदी नावाच्या या महिलेनं सोमवारी (१६ ऑक्टोबर) 'X' वरील एका पोस्टमध्ये दावा केला की, निबंधक कार्यालयातील सरकारी अधिकारी कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यासाठी तळमजल्यावर आले नाहीत.
अधिकारी स्वाक्षरीसाठी खाली आले नाहीत : ही घटना मुंबई उपनगरातील खार येथे घडली. 'मी दिव्यांग आहे. माझं लग्न १६/१०/२३ रोजी मुंबईतील खार रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झालं. हे ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं, जिथे जाण्यासाठी लिफ्टची सोय नव्हती. मात्र, अधिकारी स्वाक्षरीसाठी खाली आले नाहीत. त्यामुळे मला लग्न करण्यासाठी लागणाऱ्या सहीसाठी दोन मजले उचलून वर न्यावं लागलं', असं या महिलेनं 'X' वर लिहिलं.
अॅक्सेसिबल इंडिया मोहिमेचं काय झालं : 'पायऱ्या अतिशय उंच होत्या आणि रेलिंग सैल आणि गंजलेलं होतं. तिथे येण्यापूर्वी मी एजंटला माझ्या दिव्यांगत्वाची माहिती दिली होती. मात्र, तरीही कोणी मला मदत करण्याची ऑफर दिली नाही. त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती, असा आरोप विरालीनं केला. अॅक्सेसिबल इंडिया मोहिमेचं काय झालं, असा सवाल तिनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्राला केला आहे.