मुंबई : लोणावळ्यातील कार्ल्या येथील एकवीरा देवीच्या मंदिर निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ( Temple election dispute in Bombay High Court ) पोहोचला आहे. 15 वर्षापासून मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली नाही. मात्र मंदिराची मूळ घटनाच गहाळ झाल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यावर मंदिराची मूळ घटनाच अस्तित्वात नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून का दिले नाही ? असा संतप्त सवाल खंडपीठाने उपस्थित केला आणि राज्य सरकार आणि धर्मदाय आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ( Instructions to Charity Commissioners ) दिले आहे. या याचिकावर पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होणार आहे.
न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती : एकवीरा देवस्थानचे माजी अध्यक्ष अनंत तरे ( Anant Tare former president of Ekvira Devasthan ) यांनी विविध मागण्यांसाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही विविध आदेश पारीत करत न्यायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या काळात तत्कालीन विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे धर्मादाय आयुक्तांना निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यासाठी अंतरिम अर्ज दाखल करण्यात आला. तत्कालीन न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठाने न्यायालयीन नियुक्त अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांची नियुक्तीही करण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.