मुंबई- अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही फूट पडल्याचे चित्र आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत शरद पवारांच्या राजकीय वारसदार या सुप्रिया सुळे याच आहेत, असे म्हणत सुळेंचे अभिनंदन केले आहे.
‘राष्ट्रवादीचे 54 पैकी 53 आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. त्यामुळे शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला आहे', असे ट्विट सिंह यांनी केले आहे.
शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे, असे मोघम उत्तर बऱ्याचदा दिले जाते. अजित पवारांच्या आग्रहामुळे निवडणुकीत उतरलेले त्यांचे पुत्र पार्थ पवार पडले. तर शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री घेतली. त्यामुळे रोहित पवारांचं नावही वारसदारांच्या शर्यतीत घेतले जाते. त्यामुळे अजित पवार बिथरल्याचीही चर्चा आहे.