मुंबई:मराठी रसिक मनावर ६० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्याज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण (Senior playback singer) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन ( Sulochana Chavan Passes Away ) झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांचे निधन म्हणजे मराठी मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या निधनावर विविध स्तरातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक:"मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घरा-घरांत आणि मना-मनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे" अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, जेष्ठ लावणीसम्राज्ञी, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. 5000 वर मराठी आणि 250 वर हिंदीतील गीतांमधून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी कलाविश्व त्यांचे हे योगदान कधीही विसरू शकणार नाही. तामिळ,पंजाबी, गुजराती सिनेसृष्टीमध्ये अभिनय, उर्दू नाटकामध्ये काम ते लावणीसम्राज्ञी म्हणून लौकिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा तर आहेच, शिवाय प्रेरणादायी सुद्धा आहे. अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
शरद पवारांनी वाहली श्रद्धांजली:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील लावण्यसम्राज्ञ सुलोचना चव्हाण यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहीली आहे. निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. बुलंद आवाज व ठसकेबाज शैलीने त्यांनी लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मला हो म्हणतात लवंगी मिरची.., सोळावं वरीस धोक्याचं..., उसाला लागलं कोल्हा... अशा अनेक लावण्या त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केल्या. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या लावणीचा आवाज पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
मंत्री मुनगंटीवारांनी वाहिली श्रद्धांजली: लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. बैठकीची लावणी किती समृध्द असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चशास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातुन रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधिही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
सांस्कृतिक विश्वासाठी धक्का! :राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुलोचणा चव्हाण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांचं निधन हे महाराष्ट्राच्या कला, सांस्कृतिक विश्वासाठी धक्का आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीतातील देदिप्यमान युगाचा अंत झाला आहे. सुलोचनाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट त्यांनी केले आहे.
एक पर्व काळाच्या पडद्याआड: खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी देखील सुलोचना चव्हाण यांना ट्वीटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. लावणीसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. त्यानंतर त्यांनी शेकडो गाणी गायली. विशेषतः लावणी गायनात त्यांची स्वतःची अशी वेगळी शैली होती. त्यांना पद्मश्री सह लता मंगेशकर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे लावणी गायकीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
बुलंद आवाज हरपला: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना दीदीनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते गायिली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब प्राप्त झाला. त्यांनी केवळ लावण्यांचे नाही, तर भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन देखील समृद्ध केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असून संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.