मुंबई :शुक्रवारी रात्री सुमारे 1 वाजता बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे शेकडो भाविकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी सर्वत्र जय श्री रामचा नारा गुंजत होता. विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तैनात सुरक्षा रक्षकांना मोठी धडपड करावी लागली.
मीरा रोड येथे दरबाराचे आयोजन : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड येथे 18 आणि 19 मार्च रोजी बागेश्वर बाबांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र विरोध केला असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. धीरेंद्र शास्त्री सतत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा ते महाराष्ट्रात 'महादिव्य दरबार' उभारण्यासाठी मुंबईत पोहोचले.
कॉंग्रेसचा कार्यक्रमाला विरोध : यावेळी देखील बागेश्वर बाबांचा कार्यक्रम वादात सापडला आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात आघाडी उघडली असून, त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या त्यांच्या सत्संग कार्यक्रमावर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला पत्र लिहून धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र हे विकसनशील राज्य आहे, अंधश्रद्धा पसरवणाऱ्याला या राज्यात स्थान नाही, असे त्यांनी म्हटले आहे.