मुंबई -आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी,अशी ओळख असलेल्या धारावी पुनर्विकासाचे घोंगडे गेली 16 वर्षे भिजत आहे. धारावी पुनर्विकास पुन्हा आणखी काही वर्षे लांबणार आहे. कारण आता या प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेवर आता धारावीकरांनी संताप व्यक्त करत थेट सरकारविरोधात दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीतील सर्व संघटना एकत्र येणार असून, सरकारने त्वरित पुनर्विकास मार्गी लावावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्याचवेळी रस्त्यावरचीही लढाई पुन्हा तीव्र करणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा धारावीकर विरुध्द सरकार असा संघर्ष पहायला मिळणार आहे.
धारावीचा कायापालट करण्यासाठी 2004 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र, 16 वर्षे झाली तरी हा प्रकल्प मार्गी लागत नसल्याने धारावीकर आता संतप्त झाले आहेत. सरकारच्या उदासीन भूमिकेमुळेच पुनर्विकास होत नसल्याचे म्हणत धारावीकरांनी सरकारविरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीतील सर्व रहिवासी संघटना आता एकत्र येणार आहेत. रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू करणार असल्याची माहिती धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष राजू कोरडे यांनी दिली आहे.