पुणे Dharavi Redevelopment Project : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे. परंतु, या कंत्राट भरतीत अदानींचा फायदा जास्त असल्याचं म्हणत शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज याविरोधात मोर्चा काढत आहे. हा मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट केवळ सुपारी घेऊन काढत असून काहीही झालं तरी, आम्ही धारावीकरांना घरं देणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यात दिलीय.
टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा : धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या निविदेतील सर्व नियम आणि अटी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतल्याप्रमाणंच ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांना नेहमीच दुटप्पी भूमिका घ्यायची असते. मुंबईत टीडीआरमध्ये एक मोठी लॉबी कार्यरत असून या लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात येत आहे. काहीतरी करुन धारावी झोपडपट्टीचा विकास रेंगाळत ठेवण्याचा यांचा प्रयत्न आहे. परंतु, आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. काहीही झालं तरी धारावीकरांना पक्की घरं देण्याचा सरकारचा मानस असून आम्ही ते देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. पुण्यात विमानतळावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.