मुंबई - धारावीतील मान्सूनपूर्व कामे, प्रतिवर्षी मार्चमध्ये सुरू होतात. यावर्षी मात्र ती नुकतीच सुरू करण्यात आलेली असून, अत्यंत धीम्या गतीने ही कामे चालू आहेत. झोपडपट्टी परिसरातील २ फुटांच्या वरील नाल्यांची सफाई, जाळी असलेल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेजेसची सफाई तसेच मोठ्या नाल्यांची जेसीबी व अन्य यंत्राकरवी केली जाणारी सफाई इत्यादी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. त्यामुळे ही कामे लवकर करावी यासाठी धारावी पुनर्विकास समितीने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहत विनंती केली आहे.
धारावीतील मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी, धारावी पुनर्विकास समितीचे पालिका आयुक्तांना पत्र
धारावीमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार वारंवार घडतात. नालेसफाईची कामे अपूर्ण राहिल्यास पावसाळ्यात घरोघरी पाणी तुंबून रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने याची दखल घेत मान्सूनपूर्व आवश्यक असलेली धारावीतील सर्व लहानमोठ्या नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना विनंतीपर पत्राद्वारे केली आहे.
धारावीमध्ये मान्सूनपूर्व आवश्यक असलेली कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, तर पावसाळ्यात येथे ठिकठिकाणी पाणी साचेल व त्याचा निचरा लवकर होणार नाही. धारावीची भौगोलिक रचना बशीसारखी असून, त्यामुळे मुळात याठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार घडतात. अशा परिस्थितीत नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसेल तर पावसाळ्यात घराघरात पाणी तुंबून विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
पालिका प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेवून मान्सूनपूर्व आवश्यक असलेली धारावीतील सर्व लहानमोठ्या नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. अशी विनंती करत कृपया सहकार्य असावे अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केली असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी दिली.