मुंबई Dharavi Crime News : धारावी येथील अल्पवयीन मुलीची तस्करी करण्याचं प्रकरण धारावी पोलिसांनी उघडकीस आणलंय. या मुलीला दोन आरोपींनी पश्चिम बंगालच्या कुंटणखान्यात नेलं होतं. धारावी पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
खोट्या बहाण्यानं मुलीला फसवलं : याप्रकरणी धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी धारावीमध्ये राहात असताना तिला खोट्या बहाण्यानं आरोपींनी तिला धारावीमधून उचललं आणि नंतर त्यांनी तिला पश्चिम बंगाल या ठिकाणी नेलं होतं. मुलीच्या नातेवाईकांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलगी घरात गल्लीत कुठे दिसत नाही. म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मुलीच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात मुलीची तपशीलवार माहिती घेतली. यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोक्सो कायद्यामधील कलम चार कलम 5 आणि कलम 6 अशी नोंद आणि भारतीय दंड कलम 370 व 376 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आपल्या खबऱ्यांकडून आरोपींची माहिती काढली.
डिसेंबर महिन्यातील ही घटना आहे .पश्चिम बंगालमध्ये दोन आरोपी मुलीला पळवून घेऊन गेले होते. मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर सहाय्यक आयुक्त पोलीस आयुक्त गोविंद गंभीरे कुर्ला विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं पश्चिम बंगाल येथून मुलीस सोडवलं. याप्रकरणी दोन आरोपींना देखील अटक केलीय. आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. पुढील तपास सुरू आहे.- राजू बिडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे