मुंबई-राज्य मंत्रिमंडळातील तिसरे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज त्यावर स्पष्टीकरण दिले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत, असे टोपे यांंनी सांगितले.
धनंजय मुंडे फायटर, लवकरच बरे होतील; राजेश टोपेंचा विश्वास
धनंजय मुंडे यांचा एक अहवाल निगेटिव्ह, तर दुसरा पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
धनंजय मुंडे
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर बोलताना टोपे म्हणाले की, राज्य सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ आमदार मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील सर्व सदस्य एकदिलाने काम करत आहेत. संकटाच्या काळात नाराजी किंवा खदखद असा विषयच नाही.
राज्यातील वैद्यकीय डॉक्टरांच्या भरतीबाबत प्रक्रिया सुरू असून याबाबत ऑनलाइन मुलाखती घेण्याचे नियोजन आहे, असेही टोपे यांनी सांगितले.