मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरूनही त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा- प्रविण दरेकर - dhananjay munde news
सायबर हल्ले होत नसतात. केंद्रावर आरोप करण्यासाठी आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सायबर हल्ल्याचा दावा करत असल्याचे दरेकर म्हणाले.
समान न्याय व्हावा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी याबाबत संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी २० दिवसानंतर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर आघाडी सरकारने राजीनामा घेतला नसता, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंकजा यांची मागणी रास्तच आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको, असे सांगत मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
सायबर हल्ले होत नसतात
मुंबईत सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. याबाबत प्रशासनाचा पहिला अहवाल वेगळा होता. याबाबत समिती नेमली तेव्हा त्या ठिकाणी अहवाल वेगळा होता. मात्र, अशा प्रकारचे सायबर हल्ले होत नसतात. केंद्रावर आरोप करण्यासाठी आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सायबर हल्ल्याचा दावा करत असल्याचे दरेकर म्हणाले.
सरकारची मानसिकता नाही
पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. केंद्राच्या ठिकाणीहून दरवाढ केली जात नाही. राज्यांच्या विविध प्रकारच्या करानुसर तेथील दरवाढ होते. फडणवीस सरकारच्या काळात पाच रुपये प्रतिलिटर दर राज्य शासनाने घेतला होता. गुजरात असेल कर्नाटक राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. केंद्राने त्या राज्यासाठी वेगळा दर दिला नाही. त्या राज्याची मानसिकता तशी आहे. परंतु, ठाकरे सरकारची मानसिकता नसल्याने दर वाढले आहेत. आता अर्थसंकल्पात दर कमी करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते किती गांभीर्याने घेतात ते बघू, असे दरेकर म्हणाले.