मुंबई- राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिलेले असताना त्यांनी सत्ता स्थापन न करता राज्यात केवळ पोरखेळ सुरू केला आहे. 50-50 टक्केच्या वाट्यासाठी आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकत नाही, ही फार दुर्दैवी गोष्ट असल्याची खंत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील जनता संकटात सापडली आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा स्थितीत त्याच्या हातातले पूर्णपणे खरिपाचे पीक गेले आहे ,अशा स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता होती, असे मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद हेही वाचा - विक्रोळीतील कन्नमवार नगरात घरफोडी, १ लाखाहून अधिक सोन्याचा ऐवज लंपास
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, सेना-भाजप माझं का तुझं असे सांगत भांडत बसलेत. त्यामुळे या लोकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. हे सर्व पाप सेना-भाजपच्या लोकांचे असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
महायुती म्हणून या लोकांनी राज्यात निवडणूक लढवली, अजूनही यांची युती आहे. स्पष्ट बहुमत असताना दोन्ही पक्षांनी वेगवेगळे असे आमच्याकडे एवढे बहुमत आहे असे सांगतात. मग त्यांनी सत्ता स्थापन करावी, तसा दावा करावा. पण ते करत नाहीत. राज्यपालांकडे जाऊनही दावा करत नाहीत. त्यामुळे राज्यात सेना-भाजप जो पोरखेळ सुरू आहे, तो राज्यातील जनतेनी यापूर्वी कधी पाहिला नाही, असा आरोपही मुंडे यांनी केला.
हेही वाचा - आमदार फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर - बाळासाहेब थोरात
आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, आम्हाला राज्यातील जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे. आम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसायच्या पूर्ण तयारीत आहोत. मात्र, सरकार स्थापन होत नसल्याने आम्हाला विरोधी पक्ष म्हणून बसता येत नाही, असे मुंडे म्हणाले.