मुंबई - जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळेच माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक खोटे कारस्थान रचण्यात येत असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. माझ्यावर कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकारविरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही. पण लक्षात असू द्या, असा 'फड' रंगवणे बरे नाही! माझा लढा सुरुच राहील असेही मुंडे म्हणाले.
जगनमित्र साखर कारखान्यासाठी सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मठाला इनाम म्हणून दिलेली जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून विकत घेतली. जगन्मित्र सहकारी साखर कारखान्यासाठी ही जमीन विकत घेण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे कारखान्याचे संचालक राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.