मुंबई -दहावीच्या परीक्षांसदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज (3 जून) सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील परीक्षांसदर्भातील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. आज याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांच्यावतीने ज्येष्ठ वकील उदय वारूंजीकर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.
'याचिकाकर्त्याची ओळख काय?'
"उद्या परीक्षांच्या आयोजनात काही गडबड झाली किंवा कोरोनाची परिस्थिती अधिक चिघळली तर जबाबदार कोण? याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांची ओळख काय? त्यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान काय? याची माहिती द्या", असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले. दरम्यान, राज्य सरकारने जारी केलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप असेल तर तुम्ही नव्याने याचिका दाखल करु शकता, अशी मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.
'गुणांपेक्षा जीव महत्त्वाचा'
'यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, आगामी मान्सून आणि सध्या कोरोनाचा संपूर्ण प्रशासनावर असलेला ताण; ही यंदा दहावीची परीक्षा न घेण्याची प्रमुख कारणे आहेत', असे राज्य सरकारने स्पष्ट केले. शिवाय, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतल्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे', असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे सांगितले.