मुंबई- पोलीस दलातील जवानांना आणखी तंदरुस्त ठेवता यावे आणि नागरिकांशी चांगला संवाद ठेवता यावा, यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिली. यापुढे मॅरेथॉन दरवर्षी आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'पोलिसांच्या मॅरेथॉनमधून जनतेशी चांगला संवाद'
महाराष्ट्र पोलिसांकडून पहिल्यांदाच 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 5 हजार पोलीस दलातील जवान सहभागी झाले होते.
महाराष्ट्र पोलिसांकडून पहिल्यांदाच 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता मिलिंद सोमण, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. वांद्रे वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया 10 माईल्स, गेटवे पासून 42 किलोमीटर, वांद्रे वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया 21 किलोमीटर, गेट वे ऑफ इंडिया पासून 5 किलोमीटर असे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 17 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच 5 हजार पोलीस दलातील जवानही सहभागी होते.
पोलीस तंदुरुस्त राहिले तर आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकतात. फिट इंडिया मूव्हमेंटचा हा एक भाग आहे. यातून सशक्त आणि सक्षम पोलीस देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस आणि नागरिक खांद्याला खांदा लावून मॅरेथॉनमध्ये धावल्याने चांगला संवाद होऊ शकतो. यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून दरवर्षी 2 फेब्रुवारीला ध्वजदिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आता दरवर्षी मॅरेथॉन आयोजित केली जाईल. आज पोलीस दलातील 5 हजार जवान मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पुढील वर्षांपासून ही संख्या वाढवण्यावर भर दिला जाईल, असे जायसवाल यांनी सांगितले.