मुंबई :राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर मुंबईतील माहीम विभाग हा सध्या चर्चेचा विषय आहे. माहीममध्ये दलित, मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याच माहीममध्ये प्रभू श्रीरामाचे 150 वर्षांहून अधिक जुने मंदिर असून या मंदिरात उत्सव काळात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो लोक गर्दी करत असतात. नेमका या मंदिराचा इतिहास काय? हे मंदिर केव्हापासून सुरू करण्यात आले? या मंदिरात कोणते उत्सव साजरे केले जातात? सध्या या मंदिराची स्थिती काय यावर ईटीव्ही भारतची ही स्पेशल स्टोरी.
1864 साली मंदिराची स्थापना :या मंदिराबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी अनिरुद्ध पराडकर यांनी सांगितलं की, "हे मंदिर 1864 साली लाला भन्साळी यांनी बांधलं त्यानंतर बरोबर पन्नास वर्षांनी म्हणजे 1914 पहिलं पाच जणांचं विश्वस्त मंडळ स्थापन झालं. 1964 साली या मंदिराचा शतकपूर्ती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मी केवळ चार वर्षाचा होतो. मात्र, माझे वडील याच मंदिरात त्यावेळी पुजारी होते. त्यामुळे मला तो उत्सव आजही आठवतो. 1964 साली या मंदिराचे अध्यक्ष होते भाई सबनीस. त्यावेळी सबनीस यांच्या मनात आले, हे मंदिर आता खूप जुनं झाले आहे. याचा जिर्णोद्धार करायला हवा. मात्र, त्यावेळी मंदिर प्रशासनाकडे तितके पैसे नव्हते. भाविकांची देखील इतकी परिस्थिती नव्हती. त्यामुळे जीर्णोद्धाराची गोष्ट फक्त मनातच होती.'
गजानन महाराज सांस्कृतिक मंडळाचे सहकार्य :'सबनीस हे मंदिराच्या निधीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, पैशांची जुळवाजुळ काही होत नव्हती. अखेर सबनीस यांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी मनापासून प्रार्थना केली आणि रामराया तूच यातून काहीतरी मार्ग दाखव अशी प्रभू श्री रामाला साद घातली. 1992 साली श्री गजानन महाराज सांस्कृतिक महामंडळ मुंबई या संस्थेचे विश्वस्त भाऊ महाराज आणि वसंत गंगाधर गोगटे हे भाई सबनीस यांना भेटायला आले. त्यांनी सबनीस यांना सांगितलं आम्हाला इथं जागा हवी आहे. आम्ही इथे शेगावच्या धरतीवर मंदिराची स्थापना करू. शेगावला ज्याप्रमाणे तळघरात गजानन महाराजांची मूर्ती आणि त्यावर श्री रामाचे मंदिर आहे. त्याच प्रमाणे आम्ही इथे मंदिर बांधून देऊ. अशी ती चर्चा झाली होती.'