मुंबई:सर्वोच्य न्यायालयात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकाल आज अपेक्षीत असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस
सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी १०:३० पासून रामजन्मभूमी विवाद प्रकरणी सुनावणीस सुरुवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने, १६ ऑक्टोबरला याप्रकरणीचा निकाल राखून ठेवला होता. १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत आहेत. त्यापूर्वीच याप्रकरणी निकाल जाहीर होणार याची सर्वांना खात्री होती. त्या पार्श्वभूमीवर देशभरात राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. उत्तर प्रदेश, अयोध्या या ठिकाणी विशेष सुरक्षा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
प्रकरणातील सर्व बाजू आणि पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजात सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहीक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.