महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस - देवेंद्र फडणवीस लॉकडाऊनवर मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यावसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे. या सर्व घटकांशी पुन्हा चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 6, 2021, 8:12 PM IST

मुंबई- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे राज्यात नवीन निर्बंध लागू झाले आहेत. हे निर्बंध मात्र अतिशय कडक असून यावर राज्यातील व्यावसायिक आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेले आहे. कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यावसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी असून या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा -आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांच्या टाळेबंदीचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस टाळेबंदीसदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या टाळेबंदीचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता ही एकप्रकारची अघोषित महिनाभराची टाळेबंदीच आहे. त्यामुळे व्यावसायिक, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टसची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत, असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

हेही वाचा -उद्धवच्या हातात राज्य आहे की, त्याच्यावर कुणाचं राज्य आलंय -राज ठाकरेंची कोपरखळी

त्यामुळे पुन्हा एकदा सर्व छोट्या-मोठ्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details